दीपक खिलारे
(Indapur News )इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने ‘आकाशदर्शन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांच्या कल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.
यावेळी खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना दूरदर्शक दुर्बिणीतून प्रत्यक्ष ग्रह दाखवण्याची संधी महाविद्यालयाने उपलब्ध केली होती.
ताऱ्यांचा आढावा दूरदर्शक दुर्बीणीद्वारे…!
सध्या सूर्यास्तानंतर पश्चिमेतील आकाशात सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठ्या गुरु ग्रहाचे दर्शन होत आहे. त्याचबरोबर सूर्यमालेतील पहिला व आकाराने लहान असलेल्या बुध ग्रहही दिसतो. तसेच सध्या पश्चिम क्षितिजाच्या वरती सर्वात तेजस्वी असणारा शुक्र ग्रह स्पष्ट दिसून येत आहे. त्याच्या खालील बाजूस युरेनस ग्रह आहे. मात्र त्याला स्पष्ट पाहण्यासाठी दूरदर्शक दुर्बिणीचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर शुक्राच्या सरळ वरच्या बाजूस पहिल्या वर लालसर रंगाचा मंगळ आपल्याला दिसून येतो. या सर्व ग्रहांसोबत चंद्राच्या कलेचा व इतर ताऱ्यांचा आढावा दूरदर्शक दुर्बीणीद्वारे घेण्यात आला.
या उपक्रमाचे नियोजन प्रा. अनिकेत हेगडे यांनी केले होते. यावेळी डॉ शिवाजी वीर, डॉ. भिमाजी भोर, डॉ. राजेंद्र साळुंखे, प्रा. सुहास मखरे, नागरिक व महाविद्यालयातील ४० विद्यार्थी उपस्थित होते.
गेला महिनाभर सायंकाळच्या वेळी पश्चिम आकाशात तेजपुंज गृहगोलांच्या हालचालींचा सुंदर नजारा पाहायला मिळत आहे १ मार्च व २ मार्च रोजी गुरु व शुक्र ग्रहांची युती पाहायला मिळाली होती. तसेच २४ मार्च रोजी शुक्र व चंद्राच्या अनोख्या युतीचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी खगोल प्रेमींना भेटली. त्यानंतर २८ मार्च पासून पुढील दोन दिवस सूर्यमालेतील पाच ग्रह सरळ रेषेत पहायला मिळाले. या घटनेला ग्रेट प्लॅनेटरी अलाइनमेंट म्हणून संबोधण्यात आले होते.
– प्रा. अनिकेत हेगडे, भौतिकशास्त्र विभाग.