(Pune )पुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभाग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा २०२२-२३ या वर्षात ३ हजार २७७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून एकूण अर्ज ३ हजार ६०० इतके प्राप्त झाले असल्याने उर्वरित लाभार्थ्यांना निधी प्राप्त होताच तात्काळ लाभ देण्यात येईल, असे समाज कल्याण पुणेच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय विशेष विभागाच्या १३ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. शासनाने इयत्ता १० वी नंतरच्या इयत्ता ११ वी १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या मात्र शासकीय वसतिगृहात राहत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.
या योजनेंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत २०१७-१८ मध्ये ६५६ विद्यार्थ्यांना १६ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये १ हजार ४५७ विद्यार्थ्यांना ७ कोटी ३० लाख ८२ हजार रुपये, २०१९-२० मध्ये १ हजार ५९७ विद्यार्थ्यांना ७ कोटी ३७ लाख १६ हजार रुपये, २०२०-२१ मध्ये ९३६ विद्यार्थ्यांना ८९ लाख १७ हजार रुपये, २०२१-२२ मध्ये १ हजार १६३ विद्यार्थ्यांना ३ कोटी ४ लाख ५९ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात अधिक प्रमाणात अर्ज प्राप्त…!
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात अधिक प्रमाणात अर्ज प्राप्त होतात. या योजनेत २०२२-२३ मध्ये ३ हजार ६०० हर्ज प्राप्त झालेले असून प्राप्त १० कोटी ९ लाख ३८ हजार रुपये तरतूदीतून ३ हजार २७७ विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी विभागाकडे करण्यात आली आहे. तरतूद प्राप्त होताच सर्व अर्ज निकाली काढण्यात येतील. स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही डावखर यांनी केले आहे.