Market Committee Election | लोणी काळभोर, (पुणे) : आर्थिक उलाढालीच्या बाबतीत आशिया खंडात आघाडीवर असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळीत १८ जागांसाठी ३०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (ता. ०३) शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत ५४२ अर्जांची विक्री झाली आहे.
सर्वसाधारण, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल तोलणार या चार गटातून हे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातून ११ जागांसाठी १६५, ग्रामपंचायत गटातून ७०, आडते व व्यापारी गटातून ४० तर हमाल मापाडी गटातून २६ असे एकूण ३०१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
बुधवारी (ता. ५) या अर्जांची छाननी होणार आहे. ५४२ उमेदवारी अर्जांची विक्री शेवटच्या दिवसापर्यंत झाली असून यापैकी ३०१ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे आले आहेत. २० एप्रिल पर्यंत उमेदवाराला आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ एप्रिल रोजी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असून अनेक रथी महारथींची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. तब्बल दोन दशकांनंतर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. अनेक वर्षांनी होणाऱ्या सहकारातील प्रतिष्ठित असणारी ही निवडणूक तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लावणारी असून ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.
दरम्यान, १८ जागांसाठी १७ हजार ४१९ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या बैठका सुरू असून यामधून पक्षीय दबाव गट निर्माण करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. मध्यंतरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत करण्याचे प्रयत्न सुरू होते.
निवडणुकीचा सर्वसाधारण कार्यक्रम…
– अर्ज छाननी ५ एप्रिल
– वैध अर्ज प्रसिद्धी ६ एप्रिल
– अर्ज माघारी ६ एप्रिल ते २० एप्रिल
– अंतीम यादी व चिन्हवाटप २१ एप्रिल
– मतदान – २८ एप्रिल
– मतमोजणी व निकाल २९ एप्रिल
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!