(Ambedkar Jayanti 2023) : मुंबई : विविध विद्यापीठे आणि बार्टीने पात्र ठरवलेल्या अनुसूचित जातीच्या ८६१ संशोधकांना सरसकट फेलोशिप येत्या १४ एप्रिलआधी देण्यात यावी. अन्यथा या अन्यायाविरोधात आवाज न उठवणारे राखीव मतदारसंघातील सर्वपक्षीय आमदार आणि शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti 2023) यांच्या जयंती महोत्सवात ‘प्रवेश बंदी’ करावी, अशी हाक संविधान समर्थक दलातर्फे राज्यातील दलित जनतेला देण्यात आली आहे.
राखीव मतदारसंघातील अनुसूचित जाती- जमातींचे एकूण ४७ आमदार आणि शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्र्यांवर बहिष्कार टाकण्याचे हे आवाहन प्राचार्य रमेश जाधव, प्रा एकनाथ जाधव आणि सतीश डोंगरे यांनी संविधान समर्थक दलाच्या एका पत्रकाद्वारे आज केले.
‘सारथी’ आणि ‘ म्हाज्योती’ प्रमाणे बार्टीनेसुद्धा २०१८ सालात अनुसूचित जातीच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४०८ आणि २०२०- २१ मध्ये ५१७ संशोधकांना फेलोशिप यापूर्वी दिलेली आहे. असे असतानाही यावेळी केवळ २०० संशोधकांनाच फेलोशिप देण्याची आणि ६०० च्यावर संशोधकांना फेलोशिप नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएचडीसाठी २०२१ या वर्षात नोंदणी झालेल्या ८६१ संशोधकांना बार्टी या संस्थेने पात्र ठरवले आहे. मात्र सरकार निधीच्या कमतरतेचे कारण पुढे करुन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘ठेंगा’ दाखवला आहे. ‘आमच्याकडे फक्त २०० विध्यार्थ्यांपुरताच निधी आहे, असे राज्य सरकार सांगत आहे.
या अन्यायाविरोधात शेकडो संशोधक विद्यार्थी आपले संशोधन आणि अभ्यास केंद्रे सोडून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. पोलीस संध्याकाळी रोज त्या विद्यार्थ्यांना हुसकावून लावत आहेत. बुद्ध विहारांमध्ये आश्रय घेत गेला महिनाभर त्यांचे आंदोलन सुरू आहे.
विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली…!
फेलोशिपसाठी उपाशी तपाशी संघर्ष करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चालली असून काही जणांना रुग्णालयाची वाट धरावी लागली आहे, असे सांगून प्रा. रमेश जाधव म्हणाले की, एखाद्या विद्यार्थ्याचे काही बरे वाईट झाले तर परिस्थिती चिघळू शक्यता नाकारता येत नाही.