Chandrakant Patil | पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेतर्फे जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कामास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सांडपाणी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते.
प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे व सांडपाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या पुनरुपयोगाबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.
या प्रकल्पाची क्षमता १२७ द.ल. लिटर प्रतिदिन असून प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला ४ कोटी रुपयांची वीज निर्माण होणार आहे. ही वीज महापालिका उपयोगात आणणार असल्याने वीज खर्चात बचत होणार आहे. शहरात विविध ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यात येत असून २०२५ अखेरपर्यंत नदीत प्रक्रीया केलेले पाणीच सोडण्यात येईल. प्रकल्पातून तयार होणाऱ्या पाण्याचा उद्योगासाठीदेखील वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामास भेट…
पालकमंत्री पाटील यांनी बंडगार्डन येथील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाचीदेखील यावेळी पाहणी केली. नदीच्या दोन्ही बाजूस स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात यावी. नदी किनाऱ्यावर नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा आनंद मिळेल अशा पद्धतीने कामे करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम एकूण ११ भागात विभागण्यात आले असून त्यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा या कामासाठी मार्च २०२२ मध्ये आदेश देण्यात आले असून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. कामाचा प्रथमत: ३०० मीटरचा भाग पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.