भिगवण : पोंधवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बंडगरवाडी येथे सापडलेल्या खुनाचा उलगडा करण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे. ट्रॅक्टर – ट्रॉलीची लोखडी प्लेट चोरून घेवुन जात असताना त्यास पकडुन लोखंडी टॉमीने तोंडावर, व कपाळावर मारून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आकाश वामन काळोखे, वय- २३, रा. देहुगाव, विठलवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अरुण सिंह, (वय-५३ रा. बब्बन सिंह, गांव भेदौरा, पोस्ट भेदौरा, बसेवा, आजमगढ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोंधवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बंडगरवाडी येथे एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलीस पाटील यांनी भिगवण पोलिसांना दिली होती. सदर खुनाचा भिगवण पोलीस शोध घेत असताना कोणताही पुरावा आढळून आला नाही त्यामुळे खुनाचे गूढ उलगडणे हे पोलिसांसमोर मोठे ध्येय होते. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक सहायाने, तसेच सोशल मिडीयाच्या सहाय्याने तीन दिवस माहिती मिळवली.
त्यानुसार एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा खून हा आकाश काळोखे याने केला आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता तो उडवाउडविची उत्तरे देवु लागला. अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे राहते घराचे पार्किंगजवळ उभा असलेल्या ट्रॉलीची लोखडी प्लेट अरुण सिंह हा चोरून घेवुन जात असताना त्यास पकडुन त्यास हाताने लाथांनी त्यांचे तोंडावर तसेच लोखंडी टॉमीने त्याचे कपाळाचे वर डोक्यात तसेच उजवे कानाचे पाठीमागे मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खुन केला अशी माहिती दिली.
दरम्यान, त्यानंतर मयत इसमाची परीसरामध्ये ओळख पटू नये म्हणुन चारचाकी गाडीतून १५० किलोमीटर अंतरावर पोंधवाडी गावचे हददीत बंडगरवाडी येथे मयताचे प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्हया करण्यासाठी वापरलेले हत्यार लोखंडी टॉमी व चारचाकी गाडी जप्त केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
सदरची कामगिरी भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुंभार, गणेश पालसांडे, यांनी केली आहे.