(Pune) पुणे : नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान ‘ ज्येष्ठ लेखक , विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर करण्यात आला आहे.
मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकाकरीता असलेल्या ‘प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारा’साठी पोपट श्रीराम काळे यांच्या ‘काजवा’ या आत्मकथनाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रुपये ११ हजार रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ . मोहन आगाशे यांच्या हस्ते शनिवार ,दि. १ एप्रिल रोजी ,सायंकाळी साडे पाच वाजता कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात डॉ. कुमार सप्तर्षी आणि पोपट काळे यांना हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान(नांदेड)च्या वाङ्मय पुरस्कारांचे हे २२ वे वर्ष असून यंदा पहिल्यांदाच पुण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा होतो आहे.