दौंड, (पुणे) : दौंडचे आमदार राहुल कुल (MLA Rahul kul) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दौंड तालुक्यातील रेल्वे (Daund Railways) संबंधित प्रश्नांवर चर्चा केली. तसेच विविध मागण्यांची निवेदन (Statement of various demands) दिले.
राहुल कुल यांनी केलेल्या मागण्या…
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी) – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दौंड जंक्शन स्थानकात थांबा देण्यात यावा. खुटबाव , कडेठाण व कानगाव येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात यावेत. सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे .
सकाळी ६.१० वाजता दौंड वरून सुटणारी डेमू स्पेशल लोकल (गाडी क्र.०१५२२), सोलापूर – हडपसर पॅसेंजर (गाडी क्र. ११४२१) ) या गाड्या हडपसर स्थानकाऐवजी शिवाजीनगर स्थानकापर्यंत नेण्यात याव्यात.
दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी.
दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे.
दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, तसेच तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत.
पुणे – हैद्राबाद – पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट, LTT – विशाखापट्टणम सुपर फास्ट गाड्यांना दौंड जंक्शन येथे थांबा दयावा. दौड मेमू लोकल वेळेवर धावत नसल्याची तक्रार वारंवार येत आहेत. याबाबत प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी.
दरम्यान, सर्व मागण्यांच्या बाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याच कुल यांनी सांगितले. यावेळी आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.