पुणे : शिवसेना नेते संजय राऊत यांना रात्री पावणे एकच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षात खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. ०१) आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने काल रात्री उशिरा अटक केली आहे.
रात्री उशीरा राऊत यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर प्रतिक्रिया देताना मला अटक केली जात आहे आणि मी अटक करून घेतोय, सगळ्यांन माहिती आहे की, काय लेव्हलचे राजकारण सुरू आहे, शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, मात्र संजय राऊत शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्राची बेईमानी करणार नाही. आम्ही लढू महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना इतकी कमजोर नाही. विरोधकांना दाखवून देऊ, शिवसेना काय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेतील अधिवेशनाच्या कारणावरून राऊत यांनी मुदतवाढ मागितली होती. मात्र ईडीने ही मुदतवाढ फेटाळली होती. त्यानंतर रविवारी ईडीचे पथकच घरी पोचल्याने संजय राऊत यांना अटक करणार याची चर्चा सुरू होती. रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राऊत यांच्या ऐकेकाळच्या सहकारी स्वप्ना पाटकर यांनी राऊतांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. स्वप्ना पाटकर यांना लैंगिक अत्याचार करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळ राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांची चांगलीच कोंडी झाली आहे.