दीपक खिलारे
Harshwardhan Patil | इंदापूर : येथील वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे प्रधान सचिव (पर्यटन) यांना बृहत आराखडा सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मुख्यमंत्री शिंदे आणि पाटील यांनी मुंबईत याबाबत चर्चा…
मुख्यमंत्री शिंदे आणि पाटील यांनी मुंबईत याबाबत चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी गढी संवर्धन व स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देण्यास शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध असल्याचेही सांगितले.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे यांचे वास्तव्य असलेल्या इंदापूर येथील ऐतिहासिक गढी संदर्भात शिंदे यांनामाहिती दिली.
निजामशाहीच्या काळात अनेक गावे वतन दिलेली होती, या वतन गावांमध्ये इंदापूर हे गाव मालोजीराजे यांना वतन दिलेले होते. सन १६०६ मध्ये झालेल्या युद्धात मालोजीराजे यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांची समाधी त्यांचे वास्तव्य असलेल्या पुरातन गढी समोरील जागेत होती, याची नोंद शिवभारत ग्रंथात आढळून येते.
गढीमध्ये तहसील कार्यालय, न्यायालय यांचे कामकाज चालत होते. मात्र आता सदरची कार्यालये अन्यत्र नूतन इमारतीमध्ये स्थलांतरित झालेली आहेत. त्यामुळे आता या ऐतिहासिक मालोजीराजांच्या गढीच्या संवर्धना संदर्भात शासकीय कागदपत्रानुसार हस्तांतरण करून, गढीला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन, सदर ठिकाणी वीरश्री मालोजीराजेंचे भव्य स्मारक उभारणेच्या कामाचा बृहत आराखडा तयार करून, निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Indapur News : इंदापूरच्या विद्यमान आमदारांना युवकांचा तळतळाट लागेल ; अँड शरद जामदार