(Shirur Crime ) शिरूर, (पुणे) : चारित्र्यावर संशय घेऊन सतत दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून (murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. राक्षेवाडी (ता. शिरूर) (Shirur Crime) येथे बुधवारी (ता. १५) पहाटे हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी…!
विलास उर्फ विकास गलचंद चव्हाण (वय ३२, रा. मोहारडा तांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजी नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सविता विलास चव्हाण (वय- ३०) असे पत्नीचे नाव आहे. याबाबत मृत पतीचे भाऊ यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरूर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास चव्हाण व त्यांच्या पत्नी सविता हे कन्नड तालुक्यातील दाम्पत्य सध्या रांजणगाव सांडस जवळील राक्षेवाडी येथे कामानिमित्त वास्तव्यास आहे. ते राक्षेवडी येथील दत्तात्रेय लक्ष्मण शिंदे यांच्या उसाच्या गुऱ्हाळाजवळील पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होते. विलास चव्हाण याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय वाटत असे. त्या संशयाच्या भरात तो दारू पिऊन सतत मारहाण करीत होता.
मंगळवारी रात्री याच कारणामुळे पुन्हा दोघात जोराचे भांडण झाले. त्यात विलास याने पत्नीला पुन्हा मारहाण केली. या गोष्टीचा राग विलासची पत्नी सविता हिच्या मनात घर करून होता. सविता हिने पहाटेच्या सुमारास रागाच्या भरात पतीचा झोपेतच गळा दाबून खून केला. त्यातच पती विलास याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपास केला असता पत्नीवर संशय आल्याने त्यांनी पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. नंतर पत्नीने आपणच गळा दाबून खून केल्याचे कबूल केले. या खूनप्रकरण सविता चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत. सविता हिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड!