( Weather News ) पुणे : राज्यात सोमवारनंतर (ता. १३) उत्तर भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्यानंतरचे दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता असून १६ व १७ मार्चला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. रविवारनंतर ढगाळ स्थिती तयार होणार आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत अंशत: ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचीही शक्यता आहे. मात्र, पाऊस हलक्या स्वरूपाचा असेल.
सोसाट्याच्या वाऱ्यासह संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता…
दरम्यान, गुरुवारी ढगांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १६ व १७ मार्चला मेघगर्जनेसह व सोसाट्याच्या वाऱ्यासह संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगही ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
मुंबईत मुसळधार पाऊस, मनपाने दिला रेड अलर्ट
अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश