( Pimpri Crime ) पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात घरफोडी व वाहनचोरीतील गुजरात (gujrat)राज्यातील दोन अट्टल चोरट्या भावांच्या मुसक्या वाकड पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २४ लाख ६८ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लखनसिंग क्रिपालसिंग सरदार (वय-२८), व सतपालसिंग क्रिपालसिंग सरदार (वय-२६, रा. दोघेही घासकार दरवाजा, वासुदेव लाठीच्या समोर, वडनगर, जि. म्हैसाना, राज्य गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस वसाहत वाकड परिसरातील शासकीय निवासस्थान मध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजाचा कोयंडा कशाचे तरी सहाय्याने तोडुन घराचे बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकरमधुन घरफोडी चोरी करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१६ गुन्हे उघडकीस…
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सदर घटनेबाबत वाकड पोलिसांना योग्य त्या सुचना देऊन गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर घटनेचा वाकड पोलीस तपास करीत असताना पोलीस शिपाई भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, व पोलीस हवालदार प्रमोद कदम यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदर घरफोडी चोरी करणारे दोन चोरटे रावेत परिसरात येणार आहेत. सदर घटनेची वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी सापळा रचला.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी हे त्या ठिकाणी आले असता पोलिसांची चाहूल लागल्याने पळून जाण्यचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे त्यांची नावे सांगितली. सतपालसिंग याचे खांद्यावर अडकविलेल्या सँगमध्ये एक लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पोपट पान्हा असे साहित्य मिळून आले.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुजरात राज्यात घरफोडी चोरीचे एकुण १६ गुन्हे केले असुन सदर गुन्हयात ते फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुजरात पोलीस विशेष करून म्हेसाना व पाटण गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस शिपाई भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, व पोलीस हवालदार प्रमोद कदम यांनी केली आहे.