(Vande Bharat Express) पुणे-सोलापूरहून मुंबईच्या दिशेने चाललेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये (Vande Bharat Express ) चक्क चहासोबत कालबाह्य झालेली ”बिस्किटे’ दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.८) उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रारही नोंदविली आहे. नागेश पवार असे ऑनलाईन तक्रार करणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे.
सोलापूरहून मुंबईला निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट खानपान सेवेचा अनुभव प्रवाशांना आला. पवार हे सोलापूरहून मुंबईला याच गाडीतून प्रवास करीत होते. वंदे भारत एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक सोडले. पुढे काही वेळातच प्रवाशांना खानपान सेवेचा भाग म्हणून चहा-बिस्किटे देण्यात आली. परंतु चहासोबत दिलेली बिस्किटे उत्सुकतेपोटी न्याहाळली असता ही बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची आढळून आल्यामुळे प्रवाशांना धक्का बसला.
त्यानंतर पवार यांनी याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार नोंदविली. तसेच त्यांनी तक्रारीची चित्रफित तयार करून समाज माध्यमातून प्रसारीत केली. यात चहासोबत त्यांना देण्यात आलेल्या बिस्किटाच्या पाकिटावर बिस्किटाची उत्पादन केल्याची तारीख २६ ऑगस्ट २०२२ आहे. तर कालबाह्य तारीख २५ फेब्रुवारी २०२३ अशी आहे. मात्र, ही बिस्कीटे त्यांना ८ मार्च दिनी देण्यात आली आहेत.
दरम्यान, मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात १० फेब्रुवारीला केला होता. संपूर्ण वातानुकूलित, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त, आरामदायी आणि मध्यम जलदगती गाडी म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे सर्वत्र उत्सवी थाटात, मोदी-मोदीची घोषणाबाजी करत, वाजत-गाजत स्वागत करण्यात आले होते. मात्र या झालेल्या घटनेमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??