अहमदनगर : ‘महिला-मुलींना तक्रार करण्याची भीती वाटते. तक्रार केली तर आपले नाव उघड होईल, बदनामी होईल, शिक्षण बंद होईल या भीतीपोटी अन्याय सहन करतात. पोलीस स्टेशन हे प्रत्येक मुलीला आपले हक्काचे माहेरघर वाटायला हवे. यासाठीच शहरातील सर्व शाळा-महाविद्यालयात जाऊन महिला-मुलींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवणार आहोत असे मत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील अहमदनगर महाविद्यालयात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पोलीस निरीक्षक यादव बोलत होते.
यापुढे बोलताना यादव म्हणाले, ‘कोणत्याही मुलींना ज्ञात-अज्ञातांकडून काही त्रास झाल्याचे कोतवाली पोलिसांना समजले तर कोणत्याही मुलाची गय केली जाणार नाही. सर्वांनीच सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा अनेकवेळा सोशल मीडियावरून मुलींची फसवणूक होते. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे महिला- मुलींनी न घाबरता कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल.
पोलीस निरीक्षक यादव यांच्या संकल्पनेतून अहमदनगर शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात कडक पाऊल उचलले जाणार आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून आता नगर येथील शाळा, हायस्कुल, महाविद्यालयात जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. कोतवाली पोलीस राबवत असलेल्या विविध मोहिमेची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी बोलताना दिली.
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य रजनीश बार्नबस यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. आपल्या मनोगतात कोतवाली पोलीस यंत्रणेची सतर्कता विशद करत कोतवाली पोलीस राबत असलेल्या नवनवीन उपक्रमाची माहिती सांगितली. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आता महिला मुली निर्भय होतील असा विश्वास वुमन्स सेलच्या संचालिका प्रा.रूपाली कुलकर्णी यांनी व्यक्त करून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सर्वानुमते सन्मान केला.
या कार्यक्रमासाठी अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य रजनीश बार्नबस, उपप्राचार्य रज्जाक सय्यद, डॉ.नोएल पारगे, डॉ.प्रीतम बेंदरकर, प्रा.दिपक आल्हाट, प्रा.पवन छाब्रा, प्रा.माया उंडे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ऐश्वर्या सागडे यांनी केले तर आभार ऋचा शर्मा यांनी मानले.
महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी आता संपर्क क्रमांक!
ज्या ठिकाणी महिला-मुलींना त्रास देण्याच्या घटना घडतील त्या ठिकाणावरून पोलिसांना तात्काळ तक्रार करता येणार आहे. जिथे मुलींना असुरक्षित वाटेल यावेळी पोलीस ठाण्याशी 0241 241 6117 या क्रमांकावर अथवा थेट पोलीस निरीक्षकांच्या मोबाईलवर संपर्क साधता येणार आहे. विशेष म्हणजे लगेच मदतही मिळणार आहे.