पिंपरी : थेरगाव (पिंपरी-चिंचवड) येथील एका रुग्णालयासमोर ९ किलो गांजा विक्रीसाठी आलेल्या कर्नाटकातील दोघांना वाकड पोलिसांनी मंगळवारी (ता.७) सायंकाळी अटक
केली आहे.
राहुल विठ्ठल जाधव (वय २२, रा. गुलबर्गा, कर्नाटक), शालिवान आप्पाराव वाडी (वय ३२, रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून सात लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील दोघेजण थेरगाव येथील एका रुग्णालयासमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार आहेत. अशी माहिती वाकड पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार वाकड पोलिसांनी थेरगाव परिसरात सापळा रचला.
दरम्यान, पोलिसांनी एक संशयित कार अडवली. कारची झडती घेतली असता, कारमध्ये दोन लाख ३१ हजार ५०० रुपयांचा नऊ किलो ३०० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी कारमधील राहुल आणि शालिवान या दोघांना अटक केली. मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गांजा असा एकूण सात लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.