पुणे : महिला ग्राहक म्हणून आली अन् सोन्याच्या ब्रेसलेटवर डल्ला मारून गेली. हा प्रकार शहरातील प्रसिध्द फिनिक्स सिटीमधील ब्लु स्टोन शो-रूममधून समोर आला आहे. महिलेने हिऱ्याचा तब्बल पावणे तीन लाखांचा हार चोरून नेला आहे. ग्राहक बनून आलेल्या या महिलेने नजर चुकवून शोरुममधून ब्रेसलेट चोरून नेले आहे.
याप्रकरणी राहुल चौरसिया (वय ३०, रा. बोपखेल) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून एका अनोळखी महिलेविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिनिक्स सिटीत ब्लु स्टोन या हिऱ्याचे दागिने विक्रीचे शो-रूम आहे. याठिकाणी तक्रारदार हे स्टोअर मॅनेजर आहेत. येथे दागिने हे काचेच्या फ्रेममध्ये ठेवण्यात आलेले असतात. दरम्यान सायंकाळी साडे सहाच्या सुमारास एक महिला त्यांच्या दुकानात आली. या महिलेने नजर चुकवून शोरूममधून २ लाख ८२ हजार रुपयांचे ब्रेसलेट चोरून नेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.