पुणे : कसबा मतदार संघ भाजपचा गड आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर निवडूण येतील याची खात्री नव्हती. असे मोठे विधान राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात केले. कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर आमदार रविंद्र धंगेकरांनी शरद पवरांची त्यांच्या पुण्यातील मोदी बागेतील घरी भेट घेतली. त्यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांवेळी त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना मोठं विधान केले आहे.
पवार म्हणाले की ”रवींद्र धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती.” खरे तर यशाचं सूत्रं काय हे खरंतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे. धंगेकरांना यश मिळेल, असे सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होते, पण मला स्वतःला खात्री नव्हती. त्याचे मुख्य कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले, गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजपा आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र, पुण्यातील भाजपा सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल, असे आम्हाला वाटत होतं.
शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याबाबत कुजबुज ऐकायला मिळाली. याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे परिणाम होतील, अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होती, असेही शरद पवारांनी सांगितले.