लहू चव्हाण
पांचगणी : भारती विद्यापीठ गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून डॉ.सी.व्ही. रामन यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. विज्ञान दिवसाच्या निमित्ताने विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी अनेक विज्ञान प्रात्यक्षिके दाखवली. त्याचबरोबर माहिती सांगितली. विज्ञान शिक्षक महेश लोंढे व प्रसन्ना डांगे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुलाचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
प्राचार्य कुर्माराव रेपाका म्हणाले, महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या कृपाशीर्वादाने, माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रेरणेने संचालक एम.डी. कदम व डॉ. अरुंधती निकम यांच्या मार्गद्शनाखाली प्राचार्य कुर्मा राव रेपाका व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. ऋषिकेश वाडेकर व सिद्धी लाहिगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर वेदांत भूमकर या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.