चिंचवड : महिलांचा सन्मान खऱ्या अर्थाने करायचा असेल तर पतीच्या निधनानंतर त्या महिलेला विधवा म्हणून संबोधने हे चुकीचे आहे. अशी खंत व्यक्त करत या महिलांचा सन्मान करायचा असेल तर विधवा या शब्दाऐवजी पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरण्यात यावा. असे मत व्यक्त करत राज्य महिला आयोगाकडून राज्य सरकारला शिफारस केली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
दिशा सोशल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चारचौघी या नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील महिलांच्या सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी चाकणकर बोलत होत्या. चिंचवड नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार राज काझी कलावंतांची मुलाखत घेतली. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले, कार्याध्यक्ष राजू करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार अश्विनी जगताप, कवयित्री संगीता झिंजुरके, राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार आकांक्षा पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
चाकणकर म्हणाल्या की, ‘आपल्या समाजात आजही मुलींच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करताना आम्ही काटकसर करतो. मात्र तिच्या लग्नात हुंड्यासाठी आम्ही कर्ज काढतो. हे कुठेतरी बदलण्याची खरी गरज आहे. स्त्रियांचे प्रश्न सातत्याने समोर येत आहेत. ते कायम असून समाज कितीही पुढारलेला वाटत असला तरी स्त्रियांचे मूळ प्रश्न कायम आहे. महिलांना पुरुषांमुळेच त्रास होतो असे नाही, तर महिलाच महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.