हनुमंत चिकणे
उरुळी कांचन (पुणे) : अहमदनगरहून उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुमारे २४ लाखाच्या दोन किलो चरसची विक्री करणासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथक क्र.२ ने शुक्रवारी (ता.३) अटक केली आहे.
औरंगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी (वय-२७, रा. दर्गा दर्या रोड, मुकूंदनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी (ता.३) हद्दीत गस्त घालत असताना, पथकातील पोलीस अंमलदार योगेश मांढरे, युवराज कांबळे यांना सराईत गुन्हेगार औरंगजेब उर्फ रंगा हा उरुळी कांचन येथे चरस विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. तेव्हा आरोपी अन्सारी हा रस्त्यावर काळ्या रंगाची सॅक घेऊन उभा असलेला दिसला. पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतले. आणि त्याच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता, बॅगमध्ये २४ लाख रुपये किंमतीचे दोन किलो चरस, मोबाईल असा एकूण सुमारे २४ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपी औरंगजेब अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एक वर्षापूर्वी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता. अन्सरीवर आता लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण , एस.डी. नरके पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, संदीप जाधव, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, साहिल शेख, संदिप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझीम शेख, नितीन जगदाळे आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.