पुणे : पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अंमलदार व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे चांगलेच अंगलट आले आहे. शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
पोलीस हवालदार दिपक शिवराम लांडगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे पोलीस दलातील पोलीस अंमलदार व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल पोलील हवालदार दिपक लांडगे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. दरम्यान लांडगे यांनी पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असताना पोलीस दलातील कायदा व शिस्तिची जाण असतानाही बेशिस्त व अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरून ही निलंबनाची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे.
हवालदार लांडगे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियमांचे उल्लंघन केले आहे. निलंबन कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही. मुख्यालय सोडायचे असेल तर अपर पोलीस आयुक्त, प्रशासन व पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल दरम्यान निलंबन काळात निर्वाह भत्ता मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला निलंबन वेतन घेण्यापूर्वी निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकरची खासगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे.