दौंड, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या टोल प्लाझा नाक्यावर टोलची पावती आकारत उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून भरधाव आलेल्या मिनी ट्रॅव्हल बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. ०३) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
सचिन दिनेश कांबळे (वय-३० रा. अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे तर मिनी बसमधील आणखी १३ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोलनाक्यावर एक टँकर हा सोलापूर बाजुकडून पुणे बाजुला निघाला होता. त्यावेळी पाटस टोलनाक्यावर टोलची पावती आकारत असताना साडे आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला पाठीमागून सोलापूर बाजूकडून भरधाव वेगाने येत असलेल्या मिनी बसने जोरदार धडक दिली.
या अपघातात वाहनचालक सचिन कांबळे हा गंभीर जखमी झाला आहे. तर या बसमधील १३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या बसचा ब्रेक नादुरुस्त झाल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे बसमधील जखमी प्रवाश्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे फौजदार प्रशांत मदने, पोलीस नाईक अजित इंगवले, पोलीस शिपाई समीर भालेराव, पोलीस मित्र रमेश चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना परिसरातील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.