(डॉ. विकास शिवाजी शेळके, संस्थापक अध्यक्ष, महागणपती स्कूल रांजणगाव गणपती)
स्वतःला विसरून मुलांना घडविणारी त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई ! मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते असे म्हणतात. तिचे आईपण सामावलेले असते अपत्याविषयीच्या असीम प्रेमामध्ये. आईपण ही संकल्पना खूप व्यापक आहे; ही भूमिका कधीही न संपणारी आहे. आपल्या मुलासाठी गड उतरून जाणारी हिरकणी असो किंवा साडी नेसलेली ठसठशीत कुंकू लावलेली आई किंवा अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलणारी आधुनिक आई तिचे प्रेम मात्र सारखेच. जसा काळ बदलतो आहे तशा आई-पणाच्या कक्षा रुंदावत आहेत आजची आई जशी मुलांवर संस्कार करणारी गृहिणी आहे तसेच नोकरी करून आर्थिक आघाडी सांभाळणारी आहे.
मुलांचा अभ्यास घेणे त्यांच्या शालेय प्रोजेक्टमध्ये सहभागी होणे त्यांना सोडणे आणणे अशा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढत आपले आईपण ती निभावते आहे. घराबाहेर पडणारी आई ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत तिला तिची आई पण निभवायचे आहे. आजच्या टीव्ही इंटरनेट मोबाईलच्या जमान्यात त्या अधिकाधिक कठीण होत चाललेले आहे .अगदी लहानपणापासूनच ही साधने मुलांना मिळत असल्यामुळे त्यांचा गैरवापर अधिक होत आहे.
मुलांना वळण लावणे त्यांच्यावर संस्कार करणे हे आईसाठी अधिकाधिक अवघड होत चालले आहे.आज करिअरच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरताना आई आणि मूल दोघांनाही जीवाचा आटापिटा करावा लागतो आहे. शाळा अभ्यास तसेच खेळ आणि इतर कौशल्यांचे वर्ग यांच्यामध्ये आजची आई या सर्व जबाबदाऱ्या लिलया पेलताना आपल्याला दिसत आहे.
आईच्या मनातील उत्कट भावनेमुळे “आईचे प्रेम” मुलांना सतत जाणवत असते. म्हणूनच एखादे घाबरलेले मुल, भीतीने भेदरलेले मुल आईच्या कुशीत शिरले की, “भयमुक्त होते”. आईच्या मायेच्या स्पर्शाने हे बाळ स्वतःला सुरक्षित समजत असते. “स्त्री-पुरुष”, “आई आणि बाप”, या दोन्ही नाते-स्वरूपात ज्यावेळी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो”, त्यावेळी मुलांचा योग्य सांभाळ,आणि योग्य संगोपन, बापापेक्षा मुलाची आई जास्त योग्य करू शकते. यावर नेहमीच एकमत झालेले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती मुलांना आपली आईच महत्वाचे वाटत असते. मनातले सारे काही सांगायचे ते आईला ..!” हे विश्वासाचे नाते आई आणि मुलातील भावबंध अधिक बळकट करणारे आहे.
कुटुंबासाठी सतत झटणारी, निस्वार्थीपणे प्रेम करणारी, सर्वांची काळजी घेणारी आई, घराला आपले सर्वस्व मानणारी आई, आणि “आईला आपले सर्वस्व मानणारी मुले आपल्याला भोवताली दिसतातच की”…! हे असे आहे “आईचे महत्व”..! पण सध्या शिकलेली आई घराघराला पुढे नेई. असे सांगितले जाते. पण मग प्रत्येक घरात भविष्याची पिढी घडविली जाते काय? हा संशोधनाचा विषय ठरू लागला आहे. मुलांच्या भावनिक जीवनात आईचे महत्व सगळ्यात जास्त असते.
आई आणि वडील यांच्यामध्ये मुलांचे जास्त भावनिक नाते हे आई बरोबर जोडलेले असते. जन्मदात्या आईशी हे जवळचे भावबंध स्वाभाविक आणि सहजपणाचे असतात. आपल्या मुलांवर प्रेम करावे हे कधी कुणा आईला सांगावे लागलेले आहे काय? आईची माया, तिचे प्रेम आपल्या कुटूंबाविषयी तिला असलेली ओढ आणि काळजी या गोष्टी मुलांनाही कळत असतातच ना…!! आईची त्याग भावना आणि निस्वार्थी प्रेम भावना या दोन्ही तर साऱ्या जगाने मान्य केल्या आहेत.
जन्माला आल्यावर बोटाला धरून जगाच्या संसारात आणणारी माता ही सगळ्यात अगोदर आपली गूरू असते. हे अगदी सर्वांना कळले पाहिजे. बाळकडू देत असताना अडखळत बोलायला लावणारी व आपन हून तसे अविर्भाव करत शिकवणारी ती माता आपल्यास मिळते. हे सगळ्यात आपले भाग्य आहे. शिक्षणातला पहिला श्री गणेशा खर तर आई पासूनच मिळत असतो. म्हणूनच आई सारखा गुरू नाही असेही अनेक संत महंत उदाहरणासहित आपल्याला सांगत असतात.
शैक्षणिक धोरणा नुसार आता सहा वर्षे पुर्ण झाल्यावर शिक्षण संस्थेत इयत्ता १ली साठी प्रवेश दिला जातो. पण जन्मापासून वेगवेगळ्या भाषेत, कला गुणांनी हातवारे करत, तुमच्या कलेने घेणारे व मिळणारे शिक्षण हे फक्त आई मुळेच घडते हे लक्षात घेतले पाहिजे. आईने केलेले मुलावरील संस्कार हे त्याच्या प्रगतीचे साधन ठरू शकते. त्यासाठी आईनेही संस्काराची मुल्य जपून मुलांना घडविण्यात पुढाकार घेतला पाहिजे.
शब्दांकन : युनूस तांबोळी