पुणे : कसबापेठ विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे खासदार गिरीश बापट यांची शुक्रवारी (ता. ०३) भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.
यावेळी गिरीश बापट यांनीही धंगेकर यांना वडीलकीचा सल्ला दिला. नियोजन कर आणि नियोजना प्रमाणे काम कर, तुला काही कमी पडणार नाही. काही अडचण आली तर माझा सल्ला घे, असे बापट म्हणल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
यापुढे बोलतना धंगेकर म्हणाले, “गिरीश बापटांनी आयुष्यात कुरघोडीचं राजकारण केले नाही. त्यांची निवडणूक आणि आताच्या निवडणूकीत फरक आहे. गिरीश बापटांना मी निवडणुकी आधी भेटलो नाही. कारण त्यांच्याविषयी मनात संशयाची पाल चुकचुकायला नको. त्यांच भविष्य भाजपात घडल आहे. त्यामुळे निवडणूक काळात किंवा त्यापूर्वी त्यांना भेटलो नाही. आता निवडणूक संपली आहे. म्हणून त्यांना आता भेटलो. मला भेटणे गरजेचे होते.
ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणे आवश्यक होते. या भेटीत गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार मी काम करेल. गिरीश बापट कसलेले राजकारणी आहेत. राजकारणाचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोरचं काँग्रेस कार्यकर्त्यांची बँनरबाजी केली आहे. कसबा गणपतीसमोर समोर असलेल्या बापटांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोरचं बॅनरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या हु इज धंगेकर? या प्रश्नाला धीस इज धंगेकर… या पोस्टरच्या माध्यमातूनचं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. बापटांच्या कार्यालयासमोरचं हा बॅनर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.