दीपक खिलारे
इंदापूर : युवकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अशा कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारताच्या विकासामध्ये वैज्ञानिकाचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांमध्ये मंगळवारी (ता.२८ फेब्रुवारी) रसायनशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त राज्यस्तरीय कर्मयोगी पोस्टर स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते. कोरोना महाभयंकर संकटात विज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावर मात केली असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रसायनशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. सतीश परदेशी व प्रोफेसर डॉ. सुभाष पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या विद्यार्थी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
वैज्ञानिकाच्या संशोधनाची आठवण रहावी तसेच नवीन पिढीला संशोधनातून प्रेरणा मिळावी. यासाठी विज्ञान दिवस साजरा केला जातो असे प्रोफेसर डॉ. सतीश परदेशी यांनी यावेळी सांगितले. तर प्रोफेसर डॉ.सुभाष पिंगळे यांनी विज्ञानाचे अनेक पैलू उलघडताना त्यास स्व अनुभवाची जोड देऊन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान जागृतीची चेतना निर्माण केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाची यावेळी माहिती दिली. रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.जयश्री भोरे यांनी या कार्यशाळेविषयी माहिती देत या राज्यस्तरीय कर्मयोगी स्पर्धेत २४७ पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याची माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ ,डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. रामदास ननवरे तसेच लायनेस क्लबच्या सदस्या यावेळी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महादेव शिंदे यांनी केले तर प्रा. उत्तम माने यांनी आभार मानले.