लोणी काळभोर, (पुणे) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगी-पांडवदंड रस्त्यावरील गोल्ड सिटी परिसरात असलेल्या कोकोपिट कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. बुधवारी (ता. ०१) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.
आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे दीड तासानंतर देखील चार अग्निशामक बंबाच्या सहाय्याने तसेच कदमवाकवस्ती येथील स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :-
मिळालेल्या माहितीनुसार किरण धनराज झेंडे व संजय धनराज झेंडे यांची पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगी-पांडवदंड रस्त्यावरील गोल्ड सिटी परिसरात “पृथ्वी ग्रीन एनर्जी” नावाने कोकोपिट व इतर साहित्य तयार करण्याची कंपनी आहे. पुणे शहर परिसरातील नारळ हे या कंपनीत पुणे महानगरपालिकेचे टेम्पो मोफत आणून टाकीत होते. या नारळावर या कंपनीत प्रक्रिया करून काथ्या, पायपुसणी, कोकोपिट, नारळ कीस आदी तयार केले जाते.
बुधवारी दिवसभर कंपनीमध्ये काम सुरु होते. कोकोपीट तयार करणारी मशीन देखील सुरु होती. तापमानात झालेल्या वाढीमुळे मशीनने पेट घेतला व ती आग वाळलेल्या नारळांच्या केसरांपर्यंत पोचली व यामुळे आगीने उग्र रूप धारण केले असण्याची शक्यता आहे. यात आगीमुळे जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
दरम्यान, सदरची घटना समजताच वाघोली येथील व कदमवाकवस्ती येथील हिंदुस्थान पेट्रोल टर्मिनल कंपनीची अग्निशामक दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम मोठ्या शर्थीने सुरु आहे. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नसून कदमवाकवस्ती तसेच परिसरातील नागरिकांनी आग लागलेल्या कंपनीच्या ठिकाणी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, कदमवाकवस्ती येथील मयूर कदम, अक्षय कामठे, व प्रथमेश काळभोर यांनी टँकरने पाणीपुरवठा केला. तसेच सदर ठिकाणी कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्या माधुरी काळभोर, चंद्रदीप काळभोर, रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, शिक्षक नेते राजेश काळभोर, विशाल चौधरीसह आदींनी सदर ठिकाणी मदत केली.