पुणे : भामा-आसखेड सिंचन व्यवस्थापन जलसंपदा उपविभाग करंज विहीर (ता. खेड) येथील उपविभागीय अधिका-याला साडेतीन लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर येथील मोदीबाग बिल्डींगच्या आवारातून शुक्रवारी (ता.२४) रंगेहाथ पकडले.
तुळशीदास आश्रु आंधळे (वय ५०, उप विभागीय अधिकारी, वर्ग-१, भामा-आसखेड सिंचन व्यवस्थापन उप विभाग करंजविहीरे, ता. खेड, जलसंपदा विभाग, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ५३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा जमीन खरेदी-विक्री तसेच जमीन / प्लॉट डेव्हलप करण्याचा व्यवसाय आहे. त्यांची कोळीए (ता. खेड) येथील जमीनीचे सपाटीकरण व डेव्हलपमेंटचे काम सुरु असताना जलसंपदा विभागातील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे डेप्युटी इंजिनियर तुळशीदास आंधळे यांनी कामाच्या ठिकाणी भेट दिली.
पाहणी केल्यानंतर तुळशीदास आंधळे यांनी पूर रेषेच्या आतमध्ये सपाटीकरण / डेव्हलपमेंटचे काम केले असल्याने यावर कारवाई करणार असल्याचे तक्रारदाराला कळविले. व कारवाई न करण्यासाठी ७ लाखांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, आंधळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ७ लाख रुपयांची मागणी केल्याची निदर्शनास आले आहे. तसेच त्यातील साडे तीन लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आंधळे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपासलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.