पुणे : कडाक्याच्या उन्हाने नागरिकांच्या जिवाची काहिली होत असून शीतपेय, लिंबू सरबत यांना मागणी वाढत आहे. लिंबू गुणकारी असल्याने खाण्यात लिंबाचा वापर हा १२ ही महिने सुरू असतो. परंतु उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबांना विशेष मागणी असते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबांना मागणी वाढली आहे. बाजारात लिंबाची आवक कमी होत असून मागणी वाढल्याने दरात प्रति किलो १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.
सद्यस्थितीत बाजारात अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून दररोज १५ ते २० किलोंच्या १२०० ते २००० गोण्यांची आवक होत आहे. एका गोणीला दर्जानुसार ३०० ते १३०० रुपये भाव मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी हीच आवक तीन हजार गोणी एवढी होती. मात्र, त्याचे दर २०० ते ३०० रुपयांपर्यंत होते
लिंबांचे उत्पादन घटल्याने लिंबांची आवक निम्म्याने घटून दीड हजार गोण्यांवर आली आहे. मागणी वाढल्याने लिंबांचे भावात मोठी वाढ झाली असून, दहा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात दहा रुपयांना पाच लिंबू मिळत होते, ते आता दोनच मिळत आहेत. बाजारात लिंबांची आवक कमी होत असून, मागणी वाढल्यामुळे लिंबांच्या किंमतीत वाढ झाली आहे. लिंबाला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. दरही तेजीत असतात. होळीनंतर लिंबांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.