सागर घरत
करमाळा : श्री राम शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत शरदचंद्र पवार माध्यामिक विद्यालय कुंभारगाव हे विद्यालय चालवले जाते. या हायस्कूलचे मुख्याध्यापक भागवत खाटमोडे यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक, मानसिक व मनमनी कारभाराला कंटाळून हायस्कूलचे माजी प्रभारी मुख्याध्यापक जाधव जी. एस. यांनी प्रशालेसमोर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
जाधव जी. एस. यांनी प्रशालेत जून १९९५ पासुन ते ३१ मे २०१६ पर्यंत सहशिक्षक म्हणून तर जून २०१६ ते मे २०१९ पर्यंत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनतर संस्थेकडून खाटमोडे यांची मुख्याध्यापक पदी नेमणूक झाली. जाधव जी. एस. यांचे ७ व्या वेतन आयोगाचे १, २, ३ हप्त्याचे बिल, वेतन श्रेणी फरक बिल तसेच मे २०१९ च्या एका महिन्याचे वेतन गेल्या २-३ वर्षापासून लेखी व तोंडी मागणी करुन देखील खाटमोडे यांनी जाणिवपूर्वक काढलेले नाही.
वरील सर्व देयके वरिष्ठ कार्यालयाने लेखी आदेश देऊनही काढलेले नाहीत. म्हणून खाटमोडे यांच्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून जाधव जी. एस. व त्यांची मुलगी पूजा जाधव यांनी प्रशालेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
त्यानंतर संस्थेचे सचिव आढाव यांनी सांगितले की, संस्थेच्या वतीने जाधव यांना न्याय मिळावा म्हणून सर्व कार्यवाही करण्यात आली आहे, परंतु मुख्याध्यापक खाटमोडे हे मनमानी कारभार करत असल्याने जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत.
जाधव जी. एस. यांची सेवानिवृत्ती झाल्यापासून आज तागायत खाटमोडे यांचेकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही ही अतिशय गंभीर बाब आहे.