अजित जगताप
वडूज : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वडूज-पुसेगाव रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आज बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागरिकांनी आभार मानले.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक, एकरकमी एफ. आर. पी. देणे. शेतक-यांना दिवसा किमान दहा दिवस वीज द्या, किमान हमीभावाचा कायदा लागू करा, शेतक-यांना दिवसा वीज द्या, पिकविमा तातडीने खात्यावर जमा करा, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना पन्नास हजार रुपये दिले पाहिजे, अशा मागण्यांचे निवेदन खटावचे नायब तहसिलदार सचिन कर्णे यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सध्या विहिर व हातपंपमध्ये पाणी आहे मात्र, विज खंडित होत असल्याने पिके वाळली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सत्तेशिवाय कुणालाही काही देणेघेणे नाही, त्यामुळे खटाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. एफ. आर. पी.प्रमाणे कोणताच साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला दर देत नाहीत. ऊसाची मोळी आल्यानंतर काही साखर कारखाने काटामारी करतात. त्या समस्या सोडवल्या जात नाहीत.
कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ दि. ३१ मार्चपर्यंत देऊन फक्त पन्नास टक्के वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करावे. काही ऊस तोडणी कामगार ऊसाची तोडणी वेळी लूट करत आहेत. ऊस गेल्यानंतर दोन दोन महिने शेतकऱ्यांना एफ आर पी नुसार उसाचे पेमेंट मिळत नाही. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्यांची खातेनीहाय चौकशी करावी. रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलं आणि न्याय पद्धतीनं मागण्या मांडणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर लाठी चार्ज केला.
शिंदे -फडणवीस युतीचे सरकार पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यावर ज्या पद्धतीने लाट्याला करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. सोयाबीन, कपाशी, कांदा, द्राक्ष यासारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्ववत करण्यासाठी हस्तक्षेप करून प्रयत्न करावे. असे ही शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खटाव तालुक्यातील पदाधिकारी-शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खटाव-माणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स. पो. नि. दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर, दिपक देवकर, रमेश बर्गे, संदीप शेडगे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.