युनुस तांबोळी
शिरुर : शेतकऱ्याच्या एका एकरातील गव्हाच्या पेंढया अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कवठे येमाई (ता. शिरूर) येथे रविवारी (ता.१९) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे तब्बल ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकरी दत्तात्रय आप्पा पोखरकर यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय पोखरकर हे शेतकरी असून त्यांची कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत गट नं. ६३१ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पिक कापून मळणी करण्यासाठी गव्हाचे पेंढे एका जागेवर ठेवले होते.
दरम्यान, रविवारी (ता.१९) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोखरकर यांच्या १ एकर शेतातील गव्हाच्या पेंढया अज्ञात इसमाने पेटवून दिल्या आहेत. यांमध्ये पोखरकर यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी दत्तात्रय पोखरकर यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अनिल आगलावे करीत आहे.