पुणे : प्रेयसीचे अपहरण करून लग्न न केल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रियकरासह दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
सोमनाथ सुनील सुळ (वय-२५) आणि गणेश बापूराव महानवर (वय-२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ सूळ व फिर्यादी २२ वर्षीय तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, आरोपी हा रागीट असल्यामुळे दोघांचे पटत नव्हते. त्यामुळे त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. आरोपींनी शनिवारी (ता.१८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातील जेधे चौकातून तरुणीचे अपहरण केले.
त्यानंतर तरुणीला वाघोली, जेजुरी आणि सदाशिव पेठेत चारचाकी गाडीत घेऊन गेले. आणि आरोपी सोमनाथ सूळ याने लग्न न केल्यास तिला आणि तिच्या घरच्यांना ठार मारून टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान पीडित तरुणीने आपली सुटका करून घेतल्यानंतर तातडीने स्वारगेट पोलिस ठाणे गाठले. आणि दोघांच्या विरोधात फिर्याद दिली. स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.