दीपक खिलारे
इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन युवकांनी यशस्वी जीवन घडवावे, असे आवाहन नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांनी केले आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त राजवर्धन पाटील यांनी रविवारी (ता.१९) ठिकठिकाणी शिवजयंती उत्सवांना भेटी देऊन शिवप्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.यावेळी बोलताना राजवर्धन पाटील यांनी वरील आवाहन केले आहे.
पुढे बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले कि, राजे शिवाजी महाराजांनी राबविलेल्या धोरणांमुळेच आजही समाजिक एकोपा आपणास दिसत आहे. गनिमी कावा हे शिवाजी महाराजांच्या लढाईचे तंत्र होते. अनेक लढाया महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. आग्र्याहून सुटका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. महाराजांनी सर्व जाती व धर्मांना बरोबर घेऊन रयतेसाठी स्वराज्याची उभारणी केली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतल्यास आपण आयुष्याच्या लढाईला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो. त्यांनी समाजिक एकोप्याने राहण्याचे संस्कार आपणास दिले आहेत, असे राजवर्धन पाटील यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी भेटी प्रसंगी नमूद केले.