उरुळी कांचन, (पुणे) : हर हर महादेव’ च्या घोषात पवित्र शिवलिंगांवर केलेला अभिषेक, शिवलिलामृत पारायण, बेल- फुले अर्पण करत शनिवारी (ता. १८) पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात मोठ्या भक्तिभावाने सर्वत्र महाशिवरात्री साजरी करण्यात आली.
महाशिवरात्रीनिमित्त पूर्व हवेलीतील सर्वच ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. तर मंदिरात विविध महादेवाच्या पिंडीची मनोभावे पूजा अर्चा करण्यात येत होती. विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटेपासून अभिषेक, पूजा असे अनेक धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. सकाळी सहापासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळीही दर्शनासाठी रांग लागलेली होती. महाशिवरात्रीची सुटी असल्याने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह मंदिरात भाविकंच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत होते.
सोरतापवाडी येथील सोरतापेश्वर देवस्थान सेवाभावी संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त १७ ते १९ फेब्रुवारी या तीन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसात संपूर्ण दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोरतापेश्वर मंदिरात मंगळवारी पहाटे चार ते सुर्योदयापर्यंत अभिषेक करण्यात आला.
गायत्री होम, कावड व पालखी मिरवणूक, मिरवणुकीनंतर संस्थेच्या वतीने खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोरतापेश्वर देवस्थान सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत व समस्त सोरतापवाडी व सोरतापेश्वर भजनी मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष माउली लाड, उपाध्यक्ष सुनिल चोरघे, पांडुरंग म्हस्के, सहदेव सावंत, भाऊसाहेब चौधरी, तानाजी चौधरी, अशोक चौधरी, अनिल लाड उपस्थित होते.
उरुळी कांचन येथील महादेव मंदिरात पहाटे अभिषेक, आरती करून भाविकांना मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले. बायफ रोड महादेवनगर येथील मंदिरातहि भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी भाविकांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले. भवरापूर व टिळेकरवाडी गावाच्या वेशीवर असलेल्या फुटक्या महादेव मंदिरामध्ये नागरिकांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, महाशिवरात्रीच्या उपवासामुळे कालपर्यंत केळी ४० ते ५० रुपये डझनाने विकली जात होती, तर सफरचंद १५० रुपये किलो असा दर होता. परंतु महाशिवरात्रीच्या उपवासामुळे फळांच्या दरात विक्रेत्यांनी वाढ केली होती.
कमी दर्जाची केळीही ७० ते ८० रुपये डझनाने काही ठिकाणी विकली जात होती, तर सफरचंदाचा दर २०० रुपये सांगितला जात होता. ऐंशी ते शंभर रुपये किलोने द्राक्षे विकली जात होती.