पुणे : पुणे शहरातील तरुणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग बनविले आहे. २२ हजार ३०१ नाण्यांचा त्यासाठी वापर केला असून या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या तरुणाने बनवलेले शिवलिंग पाहण्यासाठी अनेक जण भेटी देत आहेत. देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना या शिवलिंगची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
पुणे शहरातील काळेपडळ येथील दीपक घोलप हा तरूण शिवभक्त आहे. तो नियमित शिवमंदिरात जातो. एकदा मंदिरात असताना त्याला नाण्यांपासून शिवलिंग बनवण्याची कल्पना आली. मग त्याने नाणी जमवणे सुरु केले. दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी त्याने मिळवली. तब्बल २२ हजार ३०१ नाण्यांचा वापर करुन त्याने शिवलिंग साकारले. वेगवेगळ्या किंमतीची नाणी त्यासाठी वापरली. या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा दीपक घोलप याने केला आहे. दोन, पाच, दहा रूपयांची २२ हजार ३०१ नाणी लागली. त्यासाठी त्याने चार महिने परिश्रम घेतले. दोन रुपयांची १४ हजार ९१६, पाच रुपयांची ४ हजार ८७२ तर दहा रुपयांची ५१० रुपयांची नाणी त्याने वापरली. या नाण्यांची एकूण किंमत ७९ हजार ३०१ रुपये आहे.