लोणी काळभोर, (पुणे) : इमारतीमधील निवासी गाळे हे खासगी कंपनीला भाड्याने दिले असून कंपनीने तेथे हॉस्टेल सुरु केले. मालक व चालक यांच्यात भाड्यावरुन झालेल्या वादातून मालकाने बिल्डींगच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून विद्यार्थ्यांना कोंडून ठेवण्याचा प्रकार लोणी स्टेशन हद्दीत घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना लोणी स्टेशन येथील स्टान्झा लिव्हिंग बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (ता.१७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
विद्याधर व्यंकटराव वाघधरे, सत्यभामा विद्याधर वाघधरे (दोघे रा. कल्पतरु सोसायटी, महंमदवाडी, हडपसर), केदार किसन चंदनशिव व ओमकार किसन चंदनशिव (दोघे रा. संभाजीनगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत लोणी स्टेशन परिसरात स्टान्झा लिव्हिंग बिल्डिंग आहे. या रहिवासी इमारतीमधील निवासी गाळे हे खासगी कंपनीला भाड्याने दिले.
यावेळी कोणताही भाडेकरार न करता रहिवासी इमारतीमधील निवासी गाळे डी व्टेल्व स्पेसेस प्रा. लि. या कंपनी हॉस्टेल व्यवसाय चालविण्या करीता दिले. कंपनीने तेथे हॉस्टेल सुरु केले. दरम्यान, कंपनी चालक व इमारतीचे मालक यांच्यात भाडे देण्यावरुन वाद झाला.
दरम्यान, आरोपींनी इमारतीच्या प्रवेशद्वारालाच बाहेरुन कुलूप लावून विद्यार्थ्यांना आत कोंडून ठेवले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी विद्यार्थ्याची सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करीत आहेत.