पुणे : सर्वसामान्यांचे हक्काचे फळ समजले जाणारे केळही आत्ता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले दिसून येत आहे. महाशिवरात्रीमुळे केळीची मागणी वाढल्याने शुक्रवारी (ता. १७) बाजारात केळीचे प्रतिडझनाचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. केळीला हे दर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.
महाशिवरात्रीमुळे मागील चार दिवसांत केळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, घाऊक बाजारात केळींच्या किलोचे भाव १५ ते२० रुपयांपर्यंत पोहोचले. एरवी हेच दर सरासरी ८ ते १२ रुपयांपर्यंत असतात. घाऊक बाजारात दरवाढ झाल्याने किरकोळ बाजारातही केळींच्या दरात वाढ होऊन त्याचे भाव ४० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले.
लॉकडाऊन काळात फक्त दर्जेदार केळीला मागणी राहिल्याने त्यांचे दरही कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात महाशिवरात्रीमुळे केळींना मागणी वाढल्याने केळींचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
केळीचे दर :
केळी – गावरान केळी, सोनकेळी
आवक – १० ते १२ पिकअप वाहन (दररोज)
कोठून – पुणे, सोलापूर, अकलूज, इंदापूर, फलटण
घाऊक दर – १५ ते २० रुपये (प्रतिकिलो)
किरकोळ दर – ४० ते ८० रुपये (प्रतिडझन)