दीपक खिलारे
इंदापूर : विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकाने जाळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना कुरवली (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (ता. १७) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या आगीत गणेश आबाजी जठार यांचे गणेश ऑटोमोबाईल्स, अमोल रामचंद्र जठार यांचे स्नेहा ट्रेडर्स व सागर नारायण रुपनवर यांचे अनिश इलेक्ट्रॉनिक & मोबाईल शॉपी व फर्निचर यांचे दुकान आहे.
इलेक्ट्रॉनिक, मोबाईल, ऑटोमोबाईल्स, फर्निचर, दुकानाचा समावेश असल्याने रात्रीच्या वेळी आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या.
यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून शेजारील दुकानातील साहित्य बाहेर काढल्याने दुकानदारांचे होणारे नुकसान टळले. अग्निशामक दलाने रात्री उशिरा ही आग आटोक्यात आणली.
यावेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, कुरवलीचे सरपंच राहुल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.