पुणे : लातूरमधून इनोव्हा कारमधून येऊन एसटी स्टॅण्डमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला लोणंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून पुणे, सातारा, नाशिक, संभाजीनगर जिह्यांतील १६ गुन्हे उघडकीस आले असून, कारसह १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
नरसिंग कोंडिबा बन (वय. ३८ ), इसाबाई नामदेव कांबळे (वय ४५ , दोघे रा. गांधीनगर, ता. उदगीर, जि. लातूर), हारणाबाई बाबू सकट (वय ६५, रा. देगलूर, जि. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, लोणंद पोलीस ठाणे हद्दीत बसस्टॅण्ड लोणंद येथे महिला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने चोरी केल्याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱयांनी या गुह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या टोळीला बेड्या ठोकल्या.
या टोळीमध्ये दोन महिलांचा समावेश असून, त्या उदगीर, लातूर येथून इनोव्हा कारमधून येऊन लोणंद तसेच वाई, संभाजीनगर, कवठेमहांकाळ (जि. सांगली), सांगली शहर, नाशिक, ओतूर (पुणे), लोणीकंद (पुणे) या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १६ चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून, १० तोळे सोन्याचे दागिने व इनोव्हा कार असा १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई सहायक निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, हवालदार संतोष नाळे, अतुल कुमार, पोलीस नाईक श्रीनाथ कदम, सर्जेराव सूळ, अमोल पवार, फैयाज शेख, अभिजित घनवट, अविनाश शिंदे, केतन लाळगे, प्रमोद क्षीरसागर, विजय शिंदे, विठ्ठल काळे, प्रिया दुरगुडे, अश्विनी माने तसेच उदगीर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पुलेवाड यांनी केली आहे.