लोणी काळभोर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येथील एक गाव एक शिवजयंती मोहिमे अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी कवडीपाट टोलनाका ते ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शिवजयंती निमित्त शनिवार फेब्रुवारी रोजी चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा येथील पृथ्वीराजकपूर मेमोरियल हायस्कूल मध्ये होणार आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीचा बालगट, इयत्ता सहावी ते आठवीचा माध्यमिक गट व नववी ते बारावीचा मोठा गट अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत. चित्रकला स्पर्धेत बालगटातील विद्यार्थ्यांना छापील चित्र दिले जाईल, त्यामध्ये त्यांनी रंग भरायचे आहेत.
छत्रपती शिवरायांचे बालपण, छत्रपती शिवरायांचे व्यक्तिचित्र, शिवरायांचे गडकिल्ले, माॅ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे एकत्रित किंवा वैयक्तिक चित्र, रणरागिनी हिरकणी, बाल शिवाजी व सवंगडी, माँसाहेब जिजाऊ व बाल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी या आठपैकी एका विषयावर माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी चित्र काढायची आहेत.
मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा, रायरेश्वराची शपथ, शिवजन्मोत्सव सोहळा, पावनखिंड लढाई प्रसंग, किल्ला कोंढाण्याची चढाई ( गड आला पण सिंह गेला), लाल महाल येथील चकमक प्रसंग, मावळ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज या आठ पैकी एका विषयावर चित्र काढायची आहेत.
वक्तृत्व स्पर्धेत वरील प्रमाणेच वयोगट असून सकाळी ९ ते १२ या दरम्यान वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. बालगटातील विद्यार्थ्यांनी शिवबांचे बालपण, शिवरायांची पहिली मोहीम, मी शिवबांचा मावळा असतो तर, मी पाहिलेला शिवरायांचा किल्ला या चार विषयांपैकी एका विषयावर तीन मिनिटे बोलायचं आहे.
माध्यमिक गटातील स्पर्धकाला बोलण्यासाठी ४ मिनिटांचा वेळ मिळेल. माध्यमिक व मोठ्या गटातील स्पर्धकांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, गनिमी कावा, आज शिवाजी महाराज असते तर, माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यापैकी एका विषयावर बोलायचं आहे. मोठ्या गटात प्रत्येक स्पर्धकाला बोलण्यासाठी ५ मिनिटांची वेळ असेल. मोठा गट व माध्यमिक गटाचे विषय एक सारखेच असणार आहेत.
सकाळी १० ते ११ दरम्यान होणा-या निबंध स्पर्धेतील बालगटातील विद्यार्थ्यांनी २०० शब्दात माझा शिवबा, माॅसाहेब जिजाऊ, किल्ले रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ, शिवजयंती एक लोकोत्सव या चार पैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी ३५० शब्दात शिवरायांचे आत्मकथन, किल्ले संवर्धन काळाची गरज, असा राजा पुन्हा होणे नाही, आदर्श माता जिजाऊ, शिवबांचा छावा संभाजी यापैकी एका विषयावर निबंधलेखन करायचे आहे. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी ५५० शब्दात निबंध लिहायचा आहे. माध्यमिक व मोठ्या गटासाठी निबंधाचे विषय एक सारखेच असणार आहेत.
रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ८ दरम्यान कवडीपाट टोलनाका ते ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूकीनंतर श्रीमंत अंबरनाथ मंदिर येथे रात्री ८ वाजता स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक समारंभ संपन्न होणार आहे. परिसरातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहेत.