लहू चव्हाण
पाचगणी : शहर व परिसरातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री घाटजाई-काळेश्वरी देवीचा तीन दिवसीय वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री घाटजाई-काळेश्वरी देवीचा यात्रा उत्सव करोना काळात बंद असल्याने भाविकांना देवीच्या यात्रेसाठी उपस्थित राहता न आल्याने दर्शनासाठी वंचित राहिले होते. यावर्षी यात्रा उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात व विद्युत रोषणाईच्या लखलखाट दिव्यांने भक्त भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता.
दोन वर्षांनी यात्रा कोणत्याही निर्बंधाविना साजरी झाली. त्यामुळे यंदा यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. छबिन्यात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून व पंचक्रोशीतून ढोल वाजविणारांची पथके आली होती.
यात्रेतील छबीन्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते ढोलांच्या निनादाने आसमंत दणाणून जात होता. तर अगदी लहानग्यांपासून ते आजोबांनीही स्वतःला वयाचं बंधन न घालता यात्रेत झांज वाजवत आपला सहभाग नोंदवला.
यात्रेसाठी शहर व परिसरातील भक्त आल्याने यात्रेत तुफान गर्दी झाली होती. या सोहळ्यात महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. पुरुषांची संख्याही लक्षणीय होती. मुख्य बाजारपेठेत अलोट गर्दी उसळली होती. यावेळी अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पहिल्या दिवशी मंगळवार दि. १४ रोजी सायंकाळी पाच वाजता मंदिरात देवीची आरती व महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. भाविकांच्या उपस्थित के. देवजी बापू स्टेडियम रात्री ९ वाजता देवीचा भंडारा झाला. तेथून देवीची सवाद्य मिरवणूक निघाली.
ही मिरवणूक रात्री ११ वाजता मंदिरात आली. रात्री देवीचा जागर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री १० ते पहाटे चार वाजेपर्यंत गावठाण व बाजारपेठेत भव्य ढोल, लेझीम व मिरवणूक छबीना संपन्न झाला. तिसऱ्या दिवशी सकाळी १० ते चार वाजेपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा भव्य ढोल (छबीना) संपन्न झाला.
तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी गावठाणात लोकनाट्य तमाशा झाला. सायंकाळी पाच वाजता कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर राज्यातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा फड झाला.तर याच स्टेडियमवर शुक्रवारी रात्री सिनेकलावंताच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली.