आळेफाटा : आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी कट्टा (पिस्टल), मॅगझिनची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रविण यमनाजी निचीत (वय-४५, रा. वडनेर खुर्द ता. शिरूर) सुरेश अरुमुगम मुपनार (वय ३८, मुळ रा. रूम नं. ३ सय्यद अली चाळ नित्यानंदनगर घाटकोपर वेस्ट मुंबई, सध्या रा. पिंपरी पेंढार आस्वाद हाम्टेलचे समोर ता. जुन्नर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आळेफाटा परिसरात सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर तसेच सहायक फौजदार डुंबरे यांना एका खबऱ्याकडून बातमी मिळाली की, दुचाकीवरून दोन इसम हे अवैधरित्या एक पिस्टल बाळगुन तो विक्री करण्याचे उद्देशाने आळेफाटा परीसरात फिरत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सुनिल बडगुजर यांनी याबाबत प्रभारी अधिकारी यशवंत नलावडे यांना माहिती दिली व त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आळेफाटा बसस्टॅंड परिसरात पथकाने सापळा रचला.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मोटारसायकलवर फिरत असलेल्या दोघांना पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. त्यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता प्रविण निचीत याच्या कमरेस एक गावठी कट्टा (पिस्टल) मॅगझिनसह व एक मोटारसायकल तसेच सुरेश मुपनार ताब्यातुन २ जिवंत काडतुस मिळुन आले. त्यावेळी सदरचे अग्निशस्त्राबाबत त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली.
दरम्यान, त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता सदरचे अग्निशस्त्र हे विक्री करण्यासाठी आळेफाटा येथे घेऊन आलो असलेबाबत पोलिसांना सांगीतले. पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता यातील प्रविण याचेवर गंभीर गुन्हे दाखल असुन सुरेश मुपनार याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचेकडे अजुन काही अग्निशस्त्रे आहेत का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग मंदार जवळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, लहानु बांगर, पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन अरगडे यांनी केली आहे.