पुणे : आईच्या कामगार विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन दहा हजार रुपये लाच घेताना एका खासगी महिलेसह दोघांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बुधवारी (ता.१५) केली आहे.
योगिता अरुण शेंडगे (वय.४० रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), फारुख हनिफ पठाण (वय. ५६ रा. बोपोडी) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका २१ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांच्या आईचा फेब्रुवारी २०२२ मध्ये मृत्यू झाला आहे. त्यांच्या आईची महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये बांधकाम मजूर म्हणून नोंदणी आहे. त्यामुळे त्यांना कामगार विमा म्हणून मिळणारी २ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम कामगार कार्यालयाकडून मिळवून देण्यासाठी योगिता शेंडगे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये मागितले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
दरम्यान, पुणे एसीबीच्या पथकाने मंगळवारी (ता. १४) पडताळणी केली असता योगिता शेंडगे यांनी एक लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १ हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून मागणी केली. योगिता शेंडगे यांना तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.
तसेच फारुख शेख याने लाच घेण्यास मदत केल्यामुळे दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत