पुणे : केळीचे भाव कमी केले नाही म्हणून टोळक्याने विक्रेत्याचे नाक फोडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरात शुक्रवारी (ता.१०) दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी केशव आंद्रे (वय-२१, मूळ रा. घाटकोपर, मुंबई) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंद्रे हे गोखलेनगर परिसरात केळी विक्रेता म्हणून व्यवसाय करतात. शुक्रवारी दुपारी ५-६ तरुण फिर्यादी यांच्या केळीच्या हातगाडीवर आले आणि केळी मागितली. तसेच त्यांनी भाव कमी करण्याची मागणी केली. मात्र आंद्रे विक्रेत्याने नकार दिला.
दरम्यान, याच गोष्टीचा राग मनात धरून या टोळक्याने आंद्रे यांना मारहाण केली. या मारहाणीत नाकावर मारल्याने नाकाचे हाड मोडले आहे. या प्रकरणी आंद्रे यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ४-५ अज्ञात तरुणांवर भारतीय दंडात्मक कलम १४३,१४७,३२५, १४८,१४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चतुशृंगी पोलीस करीत आहेत.