पुणे : सासूला बेदम मारण्यासाठी १० हजाराची सुपारी व घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सुनेसह चार जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
कासीम बुरानसाब नाईकवाडी (वय.२१ , रा. जेवरगी झोपडपट्टी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), मेहबुबसाब अब्दुलसाब बदरजे (वय.२५, रा. निलकोड ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), अब्दूल दस्तगीर मुल्ला (वय, १९ रा. गाव येड्रामी आंबेडकर चौक ता. येड्रामी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि ३० वर्षीय सुनेला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बिलकिस मोहम्मद ईसाक शेख यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील मिठानगर परिसरात चोरट्यांनी गुरुवारी (ता. २) रोजी बिलकिस यांच्या घरात शिरून तोंडावर टॉवल गुंडाळून दागदागिन्यांची चोरी केली होती.
या घटनेवळी तिची सून हुमेरा आणि सहा महिन्यांचा मुलगा घरात होता. मात्र, तिचे दागिने चोरट्यांनी चोरले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळविल्याने पोलिसांनी सुनेकडे विचारपूस केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तांत्रिक माहितीच्या आधारे चोरटे कर्नाटकातील गुलबर्गामध्ये असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश वाघमारे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने गुलबर्गामध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. तेव्हा आरोपींनी सून हुमजाचे नाव घेतले.
दरम्यान, सुनेला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता, सासू बिलकिस विविध कारणावरुन मला मानसिक व शारीरिक त्रास देत होती. तिच्याकडील माझे सोन्याचे दागिणे असतानाही देत नव्हती. त्यामुळे हुमेराने आरोपी कासीम बुरानसाब नाईकवडी याला घरातून दागिणे चोरण्यास सांगितले. व सासूला बेदम मारहाण करा, तिच्याकडील दागिने चोरून पुन्हा मला द्या. त्याबदल्यात मी तुम्हाला १० हजार रूपये देते. असे हुमजाने हल्लेखोरांना आमिष दाखविले होते. त्यानुसार २ फेब्रुवारीला चोरट्यांनी बिलकिस यांच्या तोंडावर टॉवेल टाकून दागिने चोरून नेले. अशी कबुली हुमजाने पोलिसांना दिली आहे.