पुणे : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी (ता. १२ ) पार पडला. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरला. एमसी स्टॅनला ‘बिग बॉस’ची चमकती ट्रॉफी मिळाली. त्याबरोबर त्याला ३१ लाख ८० हजार ही रक्कमही मिळाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन केले. यंदा ‘बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, एमसी स्टॅन , प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले.
या पाच जणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यावेळी सर्वप्रथम एका टास्कदरम्यान शालीन भानोत हा घराबाहेर पडला. यानंतर अर्चना गौतम हिचा बिग बॉसचा प्रवास संपला.
यामुळे शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी हे तीन जण बिग बॉसचे टॉप ३ स्पर्धक ठरले. यानंतर सलमान खानने टॉप २ सदस्य म्हणून शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या दोघांच्या नावाची घोषणा केली. तर प्रियांकाचा या घरातला प्रवास संपल्याचे सांगितले. यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
यानंतर सलमानने शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनला मंचावर येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने पुण्याचा रॅपर असलेल्या एमसी स्टॅनचा हात उंचावत ‘बिग बॉस’हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेत्याची घोषणा केली. त्यामुळे शिव ठाकरेला दुसऱ्या क्रमांकावर स्थान मानावे लागले.