उरुळी कांचन, (पुणे) : हवेली व दौंड दोन्ही तालुक्याच्या सीमांचा फायदा घेत डाळिंब (ता. दौंड) येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर यवत पोलिसांनी बडगा उगारला असून, यवत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे तर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
यवत पोलिसांनी आरोपींकडून १५ लाखांचा एक जेसीबी, १६ लाखांचे दोन ट्रक, त्यामध्ये अंदाजे १६ ब्रास माती मिश्रीत वाळु असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सत्यवान गोवर्धन पाटोळे (रा. कुंजीरवाडी ता. हवेली), गोकुळ जालिंदर शिंदे (रा. नायगाव ता. हवेली), आलम सुलेमान अन्सारी रा. डाळिंब ता. दौंड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सदर प्रकारमध्ये जमिन मालक व वाहण मालक या सर्वांनी कट रचून अटक आरोपी यांच्या साथीने सदर गुन्हाचा प्रकार केल्याचे निष्पन्न झाल्याने जमिन मालक बाळासाहेब भगवान म्हस्के (रा. डाळिंब ता. दौंड) या सर्व प्रकाराचा मुख्य सुत्रधार किरण सावकार म्हस्के, जे.सी.बी. मालक रविंद्र लक्ष्मण म्हस्के (रा. दोघेही डाळिंब, ता. दौंड व वाहण मालक संदीप बळीराम बारसकर रा. कुंजीरवाडी (ता. हवेली) यांना आरोपी करण्यात आलेले आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाळिंब (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत अवैधरित्या चोरून जे.सी.बी. मशिनचे सहायाने जमिन उत्खनन करून माती मिश्रीत वाळू उपसा करीत असल्याची माहिती रविवारी (ता. १२) पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. पोलिसांच्या या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
यावेळी ५० ब्रास मातीमिश्रीत वाळू साठा मिळुन आला. तसेच १५ लाखांचा एक जेसीबी, १६ लाखांचे दोन ट्रक, त्यामध्ये अंदाजे १६ ब्रास माती मिश्रीत वाळु असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मातीमिश्रीत वाळू साठा मंडल अधिकारी यवत भानुदास हरिभाऊ येडे यांचे ताब्यात दिला आहे. पुढील कारवाई करणे करणे बाबत तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी दौंड यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार संदीप देवकर, मेघराज जगताप, रविंद्र गोसावी, दत्ता काळे व चालक विजय आवाळे यांचे पथकाने केली आहे.