सागर जगदाळे
भिगवण : तरुण भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून भादलवाडी (ता. इंदापूर) येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, बिल्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘संविधान सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
आपल्या राज्यघटनेची मूलभूत माहिती जाणून घेण्यासाठी इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही, प्रजासत्ताक, मूलभूत हक्क व कर्तव्ये यासंबंधी विविध उपक्रम सादर केले. यावेळी लघु नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या राज्यघटनेचे महत्त्व उलगडून दाखवले. तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सरकारी संसदीय स्वरूप समजून घेण्यासाठी वर्ग निवडणूक घेतली आणि लोकसभेची भूमिका आणि संसदीय कामकाजाचे स्वरूप समजावले.
दरम्यान, मूलभूत अधिकारांतर्गत (विचार व्यक्त करण्याचा अधिकार) विद्यार्थ्यांनी त्यांच्या सादरीकरणाद्वारे आणि विविध बातम्या आणि लेखांच्या प्रदर्शनाद्वारे लोकशाहीतील माध्यमांच्या महत्त्वाच्या भूमिकेची माहिती सामाविष्ट केली. यातून विद्यार्थ्यांना जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाविषयी माहिती मिळाली.