पुणे : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी हिम्मत खराडे यांनी जारी केले आहेत. आणि जर या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही खराडे यांनी सांगितले आहे.
या आदेशान्वये कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, सोटा, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, प्रवर्तक किंवा क्षेपनिक उपकरणे जमा करून ठेवता येणार नाहीत किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करणार नाही. जाहीरपणे किंवा प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करणार नाही. कोणत्याही व्यक्तिीची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करणार नाही. जाहीरपणे घोषणा देणार नाही, गाणे किंवा त्यांचे ध्वनीमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनीक्षेपणही करू नये.
सार्वजनिक शांतता भंग होऊ नये. यासाठी कोणत्याही व्यक्तीस, अधिकृत अग्निशस्त्र परवाना धारक यांना त्यांच्या जवळील अग्निशस्त्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचार सभा, प्रचारादरम्यान, मतदान प्रक्रिया तसेच मतमोजणी प्रक्रीयेवर प्रभाव पडेल अशा रितीने सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगणे, प्रदर्शन करणे, दाखविणे इत्यादी बाबी करण्यास प्रतिबंध आहे. अशा प्राधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता, अगर नितिमत्तेस धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्यची वृत्ती दिसून येत असेल. अशी आवेशपूर्ण भाषणे करू नये.
सोंग अगर हावभाव करू नये आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करून नये, त्यांचे प्रदर्शने करून नये किंवा त्यांचा जनतेत प्रसार करता येणार नाही. पुणे जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणुक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधानुसार हे आदेश ५ ऑगस्ट २०२२ च्या रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहेत. हा संपूर्ण आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्यांना हा आदेश लागू होणार नाही.